Saturday, 16 February 2013

डायरी

माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......
आक्ख्या जगात एक तीच तर होती
जी माझं सगळं शांतपणे एइकून घ्यायची
मी कसाही वागलो किती ही वैतागलो
तरी रोज रात्री अलगद माझ्या हाताखाली यायची

सगळ्यांपासून लपवून
एक मोरपीस मी तिला दिलं होतं सांभाळायला
खूप समजूतदार होती ती
कधी अत्यानंदाचे क्षण मला मिठीत घेऊन तिने स्वतःत उतरवले होते
तर कधी मला शब्द देऊन तिने दुक्खाना सावरले होते
माझे सगळे हिशोब वगैरे पण तीच बघायची
थोडी ताटातूट चालायचीच
पण ती ही निमूटपणे सगळं पाहायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

बोलली नाही ती कधी मला
पण लपून छपून ती ही माझ्यावर प्रेम करायची
स्वतःच्या आयुष्यातील काही पाने तिने मुद्दाम कोरी ठेवली होती
माझ्यासाठी...
मी ही मग त्यावर कधी हिशोब मांडायचो नाही
अशी सगळी गंमत चालायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

कधी कधी मला खूप भरून यायचं
अगदी आतून आतून तुटायचं
खूप एकट एकट वाटायचं
तेव्हा ही असायचीच सोबत
अगदी पहाडासारखी खंबीर माझ्या बाजूला
माझ्या डोळ्यातल्या सरीना तिनेच तर आंगण दिले होते
मुक्तपणे बरसायला
अश्रूनी पुसल्या गेलेल्या माझ्याच शब्दांचे अर्थ
मलाच कानात येऊन सांगायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

एकदा रात्री मी नशेत असताना
मला ती सोडून गेली
माझे मोर पीस मात्र आठवणीने देऊन गेली
सालाबाद प्रमाणे मी ही तिला विसरून गेलो
नव्या संकल्पांच्या जोशात तिला कुठेतरी सोडून आलो

परवा घर आवरताना अचानक
पोटमाळ्यावर मला ती दिसली
माझ्याप्रमाणे ती ही आता म्हातारी झाली होती
पण तरी ही अगदी अगदी ओळखीचं हसली
मी तिला हातात घेतलं
माझ्या पाणावलेल्या डोळ्या ईतकेच
तिचे काठ पण थोडेसे ओलावले होते
एवढी वर्षं निघून गेली पण तरीही
तिची सवय गेली नव्हती
माझ्या मनातलं किती अचूक ती ओळखायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......
                                     
                                                --  भालचंद्र भुतकर