Friday 5 August 2022

तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी

 आता कसं की, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी


आपण दोघे सुखरूप राहू

आता आपली सुख-दुःखं वेगळी

आपल्या वाटा वेगळ्या

आपले किनारे वेगळे

आपल्या लाटा वेगळ्या

आता तुझे सर्वस्व तू

आणि माझे सर्वस्व मी

आयुष्यभर अशीच समांतर भटकंती करून आपली भेट होईल ती आता स्मशानातच...

परंतु

तिथे सुद्धा तुझी चिता वेगळी

माझी चिता वेगळी

तुझ्या-माझ्यासाठी रडणारे काही डोळे मात्र कदाचित सामाईक असतील...त्यांच्या दुर्दैवाने ...

तुझी-माझी राख गंगेमध्ये टाकलीच जर कुणी, तर तिथे मात्र आपण एकरूप होऊ,

तोपर्यंत आपण सुखरूप राहू,

तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी...


-भालचंद्र


Saturday 10 January 2015

मृत्युपत्र

प्रत्येक श्वासागणिक मागे पडत चाललेलं आयुष्य
त्याच्यावर उमटलेले असंख्य पावलांचे ठसे
हातातून सुटलेल्या हातांचे दरवळणारे सुगंध
माझ्याच मनाच्या भिंतींना धड़कून माघारी आलेले माझ्याच हाकांचे प्रतिध्वनि
कित्येक स्वप्नांची होळी करून, त्यावर भाजलेल्या पोळ्यांचे खरकटे तुकडे
कधीकाळी माणुसकी अस्तित्वात असल्याचे काही जुने संदर्भ
कोणतीच गोष्ट शाश्वत नसल्याची शाश्वती
भविष्यकाळात वावरणारे दोन खिन्न डोळे
भूतकाळात घट्ट रुतून बसलेले दोन पाय
आणि वर्तमानात तडफड़णारे विकलांग शरीर
एवढ़ी मिळकत आयुष्यभराची...आणि वारसदार मिळेना
कोणाच्या नावे लिहायचं मृत्यपत्र ?

-भालचंद्र

Thursday 4 September 2014

निनावी

प्रत्येक नात्याला नाव दिलेच  पाहिजे असे नाही
काही नाती असू द्यावीत निनावी
नाव आलं म्हणजे त्याला बंधनं आली

अपेक्षांच्या , स्पर्शाच्या , शब्दांच्या भिंती आल्या
शरीराचे, विचारांचे   उंबरे आले

हिरव्याकंच वनराई मध्ये पडलेल्या कोवळ्या उन्हाप्रमाणे त्याने दिसावे
कधी त्याने फुलपाखरू होऊन हृदयरूपी फुलांवर स्वैर बागडावे
तर कधी झाडावरचे पान होऊन स्वेच्छेने अलगद  जमिनीवर पडावे …
अशा वेळी आपण काहीच करू नये
फक्त  बघत राहावं …अत्यंत कौतुकाने
तरळू द्यावं डोळ्यात पाणी … अतिशय आनंदाने
अशा वेळी शब्दांची जुळवाजुळव करूच नये मुळी …
डोळे बंद करून फक्त श्वासोच्छ्वास जमवावा
त्याचा सुगंध आपल्या श्वासा श्वासा त भिनू द्यावा

जन्म सार्थकी लागला असे समजावे
फक्त एक नाते निनावी असू द्यावे

--भालचंद्र

Sunday 13 July 2014

शोध अस्तित्वाचा

 रोज सकाळी अंथरुणातून उठताना जाणीव होते छाताडावर नाचणाऱ्या माझ्याच अगणित अस्तित्वांची . जणू काही मी डोळे उघडायचीच वाट  बघत रात्रभर माझ्या अवतीभवती ते सगळे वावरत असतात आणि मी डोळे उघडताक्षणीच माझ्या उरावर असंख्य प्रश्नचिन्ह घेऊन  नाचायला लागतात.  हे आता सवयीचं होऊन बसलंय. रक्तपिपासू जळवान्प्रमाणे माझ्या मनाला चिकटून बसलेल्या या अस्तित्वांच्या प्रश्नांना तोंड देता देता माझ्या तोंडाला फेस येतो.

प्रश्न असा पडतो की , मी नेमका आहे तरी कोण ?

आतून कुठूनतरी एक ठरलेले उत्तर येते ...  इंजीनियर, लेखक, मित्र, भाऊ, मुलगा, प्रियकर, खेळाडू, हिंदू, माणूस, देव, राक्षस इत्यादी इत्यादी हजारो बरोबर उत्तरांपैकी एक उत्तर आपली बाजू मांडत काही काळ रेंगाळत राहत मनभर. दिवसभराच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मी वेगळा वेगळा असल्याचा शोध लागतो माझा मलाच. सकाळी उठल्यानंतर मी  सुजाण  समाजातील एका सुशिक्षित कुटुंबाचा एक भाग असतो. त्यातही मुलगा, भाऊ, मामा, काका इत्यादी शेकडो उपप्रकार आहेत. उदरनिर्वाहाच्या शोधात बाहेर पडल्यानंतर मी एक मध्यमवर्गीय , प्रामाणिक असा नोकरदार असतो. त्यातही कोणासाठी जुनिअर , कोणासाठी सिनिअर , कोणासाठी अतिमहत्वाचा तर कोणासाठी अतिसामान्य अशा क्याटेगरीज आहेत. संध्याकाळच्या वेळी मित्रांसोबत चहा घेत  गप्पा मारताना मी एक प्रेमळ, विश्वासू मित्र असतो

       असा दिवस निघून गेला की वाटत एक अख्खं आयुष्य निघून गेलं. रात्री, अंगावरचे कपडे खुंटीवर टांगताना कपड्यांसोबत मी मलाच टांगत असल्याचा भास होतो. त्याच खुंटीवर काही वर्षांनी एक म्हातारी काठी टांगत असल्यासारख वाटत, तर आणखी काही वर्षांनी मी स्वत:च फोटो बनून लटकत असलेला सुद्धा दिसतो. त्या फोटोतल्या "मला" सुद्धा कितीतरी अस्तित्वे लगडलेली असतात- कुणाचा आजोबा, कुणाचा बाप, कुणाचा मित्र, तर कुणाचा शत्रू, कुणासाठी निष्फळ , निरुपयोगी, उपद्रवी, किरकिरा म्हातारा, तर कुणासाठी प्रेमळ, आनंदी, निस्वार्थी , दयाळू  देवमाणूस.

आता मी नेमका कोण आहे याचा शोध घेत घेत मन खोल जाऊ  लागत, जितक खोल जाइल तितकंच सारं फोल वाटू लागत. संभ्रमावस्थेत मग मी देवघरात जतो. तिथेही  तीच परिस्थिती - स्थितप्रद्न्य ,शांत , निश्चल अशा अनेक प्रतिमा तिथे धूळ खात पडलेल्या दिसतात , प्रार्थनेला त्यांच्यापैकी कोणाला निवडावे हा एक निराळा प्रश्न.

      तिथून उठून मी घराबाहेर पडतो , तर देवळात जावे कि मशिदीत, चर्च मध्ये कि गुरुद्वारामध्ये असे विविध प्रश्न उभे असतात माझ्या दारात. देऊळ हा ऑप्शन निवडला , तर पुन्हा कोणत्या देवळात ? हा मागोमाग येणारा प्रश्न.

 छ्या …. साला सगळच खोट  आहे , सगळच व्यर्थ आहे , मर्त्य आहे मर्यादित आहे . अमर्याद आहेत त्या फक्त माझ्या शंका आणि माझ्या पाचवीला पुजलेल्या अस्तित्वांच्या रांगा . मग अस्वस्थता, चिडचिड , स्वत: शी भांडण असे रोजचे  ठरलेले  कार्यक्रम झाले की कधीतरी मी हताश , निराश होऊन डोळे मिटून पडतो आणि अचानक शोध लागतो मला स्वत्वाचा . मला उत्तर मिळून जात ... "मी" कोणीच नाहीये , मुळात "मी" हि संकल्पना च खोटी आहे.
आहे तो फक्त प्रवास , तिमिरातून तेजाकडे, अनंतातून अनंताकडे, क्षितीजाकडून क्षितिजाकडे . मेल्यानंतरही न सुटणारी अशी चिकट अस्तित्वे आयुष्यभर कमावल्यानंतर त्यातलं एक तरी अस्तित्व कोण्या एकाच्या  तरी आयुष्यभर लक्षात राहील असे जगावे असे मला वाटते.

कारण...  खुंटी तशीच राहील तिथे , बाकी खुंटीवरचे  कपडे, काठ्या , फोटो आणि दृश्य- अदृश्य स्वरूपातील नादान , निर्लज्ज अस्तित्वे बदलतच  राहतील पिढ्यान पिढ्या ,युगानु युगे …

गर्दीत माणसांच्या हरवून जन्म गेला
नुसत्याच येरझाऱ्या, घालून जन्म गेला

--भालचंद्र जयप्रकाश भुतकर

Monday 7 July 2014

असे जीवनाचे ऋतू फार आले
पुन्हा आसवांचे  हसे फार झाले
तसा सावराया मला  मीच होतो
जरी जीवघेणे असे वार झाले

तुझ्या वेदनांचे ठसे व्यर्थ काही
तुझ्या यातनांचे मुके अर्थ काही
जगी वावराया , पुरे एवढेसे
तुझ्या सोबतीची मला आस नाही

कसे काय सांगू ,जपतो उराशी
कसे दु:ख माझ्या भिजते उशाशी
तरी बोललेलो , कितीदा तुला मी
नको खेळ खेळू असे काळजाशी

जरी वादळे ही  सदोदीत देवा
कधी थांबलो ना तुझ्या पायरीला
नसे वाकण्याचे स्वभावात माझ्या
असे मोडलेला कणा सोबतीला

--भालचंद्र

Monday 30 June 2014

अस्तित्व

आज सकाळी मला जाग आली तेव्हा
अंथरुणात पडलेल्या अस्तित्वांच्या गाठोड्याकडे लक्ष गेले
त्या गाठोड्यात प्रत्येक अस्तित्वासोबत
रंगी-बेरंगी बुरखे ठेवले होते कुणीतरी …बहुतेक मीच

संभ्रमावस्थेत एक बुरखा मी उचलला इतक्यात
दुसर्याने नाराजीचा सूर आळवला
दुसर्याला हातात घेताच तिसर्याने डोळे वटारले
वैतागून मग सगळे बुरखे तिथेच टाकून तडक उठलो अन ध्यानात आले
पायात बेड्या ठोकल्या होत्या कुणीतरी …बहुतेक मीच

गडबडीने खिसे चाचपुन एक किल्ली काढली
बेड्या सोडवायचे लाख प्रयत्न केले , मग आठवलं
भूतकाळाच्या कुलुपांना भविष्याची किल्ली लागत नाही
थकलो, रडलो , कुलूप तुटतंय का बघून झालं
माझ्या प्रत्येक घावानिशी अधिकाधिक मजबूत होत चाललेल्या त्या बेड्या माझ्यावर हसू लागल्या
मी हताश , निराश तसाच पडून राहिलो काही काळ

जाग आली तेव्हा माझ्याच कर्तृत्वाची दुर्गंधी पसरली होती घरभर
आता मात्र निकराने आळस झटकून उठलो
निश्चयी मुद्रेने सगळ्या बुरख्यांची घडी घालून व्यवस्थित ठेवले
उशीखाली हात फिरवला , एक किल्ली मिळाली
सगळ्या बेड्या एका झटक्यात सुटताना कळलं कि
वर्तमानाची किल्ली सगळ्या कुलुपांना लागते

सारं सामान एका पोत्यात भरून पाठीवर टाकलं
उशाशी पडलेला हसरा मुखवटा उचलला आणि दणकट पावले टाकत मी चालू लागलो

अस्तित्वाची लढाई मी रोज अशीच
कर्तव्याच्या ढाली ने नि नाईलाजाच्या तलवारीने
आजवर जिंकत आलोय

---भालचंद्र 

Wednesday 4 June 2014

कविता

चंद्र , सूर्य , तारे,
फुले, पक्षी, झाडे
डोंगर दऱ्या नि समुद्र सारे 
सगळे जिथल्या तिथे ठेवूया 
आणि मग एक कविता लिहूया 

कशाला हव्यात सुख दुक्खांच्या कुबड्या 
अन कशाला हवीय ती ?
आठवणी वगैरे दाटून बिटून येउदेत कि यायच्यात तेव्हां 
कुंथून कुंथून किती शब्द हागणारेस ?
स्वर, व्यंजन, वृत्त, मात्रा , अलंकार
एवढेच काय तर शब्द च सारे बाजूला ठेवूया
आणि मग एक कविता लिहूया

वाहवा नि टाळयांचा मोह आवर थोडासा
स्वत्व सोडून गेलेल्या स्वत:ला सावर थोडासा
यमक छन्द जुळवशिलच की शेकडो बरी बुरी
एक तरी ओळ लिही लेका खरी खुरी
आयुष्याच्या शाईने जगणे लिहू थोड़े थोड़े
बाकी कागद सारे कोरेच ठेवूया
आणि मग एक कविता लिहूया

जखमा आणि वेदनांचे सूर आळवलेस किती
दिसू नए कोणाला म्हणून
ओघळलेले आश्रू वाळवलेस किती
देण्या घेण्याचा हिशोब होइल च की ढगात
आपण खाली फ़क्त जगणे शिकून घेउया

सूर्य चन्द्र तारे
फुले पक्षी झाडे
डोंगर दरया नि समुद्र सारे
सगळे जिथल्या तिथे ठेवुया
आणि मग एक कविता लिहूया

--भालचंद्र