प्रिय पावसा ,
बाबा रे , तुला काही लाज वगैरे वाटते की नाही ? किती दिवस झाले फिरकलाच नाहीस इकडे अजिबात. परवा माझी ४ वर्षाची भाची गाणे म्हणत होती " सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल काय ? " तेव्हाच तुझी आठवण आली. म्हटलं आज तुला पत्रच लिहून विचारावं , कधी येण्याचा विचार आहे साहेबांचा ?
महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय तुला माहिती आहेच , पण मला त्याबद्दल नाही बोलायचं तुझ्याशी आज. महाराष्ट्रातल्या दुष्काळपेक्षा सुद्धा खूप मोठा दुष्काळ पडलाय माझ्या मनात. खूप दिवस झाले रे हसता हसता रडून आणि रडता रडता हसून. पूर्वी हृदयाच्या कप्प्या कप्प्यातून आनंद- दुक्खा चे झरे वाहायचे गोड-खारट पाण्याचे... आता ते ही अगदी आटले आहेत. बाकी माझं अगदी उत्तम चालू आहे असं लोकं म्हणतात. माझ्याप्रमाणेच ते ही मनाने दुष्काळग्रस्त असावेत. माझ्या कोरड्या हसण्याला फसतात ते सगळे. तसे हल्ली सगळेजण दुष्काळग्रस्तच भेटतात मला. कोणी हंगामी तर कोणी बारमाही. रोज उठून तेच दुष्काळी चेहरे बघायचा कंटाळा आलाय बघ . मध्यंतरी सरकारने खोटा खोटा पाऊस पाडायचा प्रयत्न केला तेव्हा थोडा आसावलो होतो मी. म्हटलं पाऊस पाडायला नाही जमलं तर निदान ढग तरी दाटून आणा थोडेसे. तेवढाच थोडासा रडून मोकळा झालो असतो मी. पण तो ही प्रयोग फसला नेहमीप्रमाणे. म्हणून मग आता म्हटलं डाइरेक्टच विचारावं तुला.
खूप जुना आणि सगळ्यात जवळचा मित्र एकटाच आहेस रे तू माझा . मागच्या पावसाळयापासून साचलेलं सगळं सांगायचं आहे तुला. खूप गोष्टी तुझ्याशी शेअर करायच्या आहेत ज्या मी फक्त आणि फक्त तुलाच सांगू शकतो. तुला घट्ट मिठी मारुन कडकडून भेटायचंय मला. तू आलास की किती मस्त हुन्दडतो ना आपण सगळीकडे. तू म्हणशील तिथे म्हणशील तितका वेळ भटकत असतो मी तुझ्यासोबत. मागच्या वर्षी " राहिलेली मजा पुढच्या वर्षी " असं सांगून गेलास तीच राहिलेली मजा आता मला करायची आहे.
आणि आलास ना या वेळी की नुसतं थेयिमान घाल. कोणाचंही काहीही एइकू नकोस. तुला माहितीये मी फक्त बाहेरून भिजत नाही. आतून , अगदी आतून प्रत्येक कप्पा न कप्पा चिंब झाल्याशिवाय मला तू आल्यासारखं वाटत नाही. तू भिजवलेल्या मातीचा गंध नसानसांतून भिनवल्याशिवाय मला जिवंत असल्यासारखाच वाटत नाही.
असो... आणि हो ,एकटाच येऊ नकोस. येताना "तिची" आठवण पण घेऊन ये आठवणीने. या वर्षी थोडी कमी आण , पण आणच. काय आहे ना, शरीराचं कितीही वय वाढलं तरी मनाचं वय नाही रे वाढवता येत. थोडी हूरहुर पण घेऊन ये झालंच तर. तिच्या ओल्या हातांच्या स्पर्शाचा भास मात्र नको आणूस ...का ते तुला आल्यावर सांगेन मी .सगळ्याच गोष्टी अशा पत्रात लिहीणे बरोबर नाही.
या वर्षी आलास की मी तुला लवकर मात्र जाऊ देणार नाही . पुढच्या वर्षी तू परत येईपर्यंत पुरेल एवढा ओलावा माझ्या हृदयाला आणि मनाला दे आणि मग जा खुशाल हवं तर . आणखी एक म्हणजे हे पत्र तुला मिळेल तेव्हा नेहमीसारख ओलं ओलं नाही लागणार हाताला . अरे दाटून खूप आलंय रे पत्र लिहिताना पण मी रडणार मात्र नाही या वेळी . तसं ठरवलच आहे मी. म्हटलं तू आल्याशिवाय आता रडायचच नाही अजिबात. तू आल्यावरच काय असेल ते होऊन जाऊ दे तुझ्यासमोर . म्हणून रोखून ठेवले आहेत अश्रू तुझ्यासाठी.
बर आता जास्त काही एमोशनल लिहीत नाही. लवकर ये आता इकडे. आणि यायच्या आधी कळव नक्की मला . मागच्या वर्षी सारखा असा अचानक दारात येऊन उभा राहू नकोस . काही सुचत नाही रे तू असा एकदम आलास की . अगदी कावराबावरा होउन जातो मी . मी तुला न्यायला येइन यंदा माझ्या नवीन बाइक वरुन .तिथेच आपल्या नेहमीच्या टेकडीवर . आई ला पण सांगून ठेवलंय मी तुझ्या आवडीची कांदा भजी करायला. आता जास्त वाट पाहायला लावू नकोस आणि ये बरं पटकन .
तुझा आणि फक्त तुझाच बारमाही पावसाळी मित्र. :)
भालचंद्र
ekdam mast...
ReplyDeleteZabardasst Bhalchandra
ReplyDeleteआई ला पण सांगून ठेवलंय मी तुझ्या आवडीची कांदा भजी करायला...
ReplyDeleteहा हा हा, हे चांगलं आहे राव!!!