Friday, 5 August 2022

तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी

 आता कसं की, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी


आपण दोघे सुखरूप राहू

आता आपली सुख-दुःखं वेगळी

आपल्या वाटा वेगळ्या

आपले किनारे वेगळे

आपल्या लाटा वेगळ्या

आता तुझे सर्वस्व तू

आणि माझे सर्वस्व मी

आयुष्यभर अशीच समांतर भटकंती करून आपली भेट होईल ती आता स्मशानातच...

परंतु

तिथे सुद्धा तुझी चिता वेगळी

माझी चिता वेगळी

तुझ्या-माझ्यासाठी रडणारे काही डोळे मात्र कदाचित सामाईक असतील...त्यांच्या दुर्दैवाने ...

तुझी-माझी राख गंगेमध्ये टाकलीच जर कुणी, तर तिथे मात्र आपण एकरूप होऊ,

तोपर्यंत आपण सुखरूप राहू,

तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी...


-भालचंद्र


Saturday, 10 January 2015

मृत्युपत्र

प्रत्येक श्वासागणिक मागे पडत चाललेलं आयुष्य
त्याच्यावर उमटलेले असंख्य पावलांचे ठसे
हातातून सुटलेल्या हातांचे दरवळणारे सुगंध
माझ्याच मनाच्या भिंतींना धड़कून माघारी आलेले माझ्याच हाकांचे प्रतिध्वनि
कित्येक स्वप्नांची होळी करून, त्यावर भाजलेल्या पोळ्यांचे खरकटे तुकडे
कधीकाळी माणुसकी अस्तित्वात असल्याचे काही जुने संदर्भ
कोणतीच गोष्ट शाश्वत नसल्याची शाश्वती
भविष्यकाळात वावरणारे दोन खिन्न डोळे
भूतकाळात घट्ट रुतून बसलेले दोन पाय
आणि वर्तमानात तडफड़णारे विकलांग शरीर
एवढ़ी मिळकत आयुष्यभराची...आणि वारसदार मिळेना
कोणाच्या नावे लिहायचं मृत्यपत्र ?

-भालचंद्र

Thursday, 4 September 2014

निनावी

प्रत्येक नात्याला नाव दिलेच  पाहिजे असे नाही
काही नाती असू द्यावीत निनावी
नाव आलं म्हणजे त्याला बंधनं आली

अपेक्षांच्या , स्पर्शाच्या , शब्दांच्या भिंती आल्या
शरीराचे, विचारांचे   उंबरे आले

हिरव्याकंच वनराई मध्ये पडलेल्या कोवळ्या उन्हाप्रमाणे त्याने दिसावे
कधी त्याने फुलपाखरू होऊन हृदयरूपी फुलांवर स्वैर बागडावे
तर कधी झाडावरचे पान होऊन स्वेच्छेने अलगद  जमिनीवर पडावे …
अशा वेळी आपण काहीच करू नये
फक्त  बघत राहावं …अत्यंत कौतुकाने
तरळू द्यावं डोळ्यात पाणी … अतिशय आनंदाने
अशा वेळी शब्दांची जुळवाजुळव करूच नये मुळी …
डोळे बंद करून फक्त श्वासोच्छ्वास जमवावा
त्याचा सुगंध आपल्या श्वासा श्वासा त भिनू द्यावा

जन्म सार्थकी लागला असे समजावे
फक्त एक नाते निनावी असू द्यावे

--भालचंद्र

Sunday, 13 July 2014

शोध अस्तित्वाचा

 रोज सकाळी अंथरुणातून उठताना जाणीव होते छाताडावर नाचणाऱ्या माझ्याच अगणित अस्तित्वांची . जणू काही मी डोळे उघडायचीच वाट  बघत रात्रभर माझ्या अवतीभवती ते सगळे वावरत असतात आणि मी डोळे उघडताक्षणीच माझ्या उरावर असंख्य प्रश्नचिन्ह घेऊन  नाचायला लागतात.  हे आता सवयीचं होऊन बसलंय. रक्तपिपासू जळवान्प्रमाणे माझ्या मनाला चिकटून बसलेल्या या अस्तित्वांच्या प्रश्नांना तोंड देता देता माझ्या तोंडाला फेस येतो.

प्रश्न असा पडतो की , मी नेमका आहे तरी कोण ?

आतून कुठूनतरी एक ठरलेले उत्तर येते ...  इंजीनियर, लेखक, मित्र, भाऊ, मुलगा, प्रियकर, खेळाडू, हिंदू, माणूस, देव, राक्षस इत्यादी इत्यादी हजारो बरोबर उत्तरांपैकी एक उत्तर आपली बाजू मांडत काही काळ रेंगाळत राहत मनभर. दिवसभराच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मी वेगळा वेगळा असल्याचा शोध लागतो माझा मलाच. सकाळी उठल्यानंतर मी  सुजाण  समाजातील एका सुशिक्षित कुटुंबाचा एक भाग असतो. त्यातही मुलगा, भाऊ, मामा, काका इत्यादी शेकडो उपप्रकार आहेत. उदरनिर्वाहाच्या शोधात बाहेर पडल्यानंतर मी एक मध्यमवर्गीय , प्रामाणिक असा नोकरदार असतो. त्यातही कोणासाठी जुनिअर , कोणासाठी सिनिअर , कोणासाठी अतिमहत्वाचा तर कोणासाठी अतिसामान्य अशा क्याटेगरीज आहेत. संध्याकाळच्या वेळी मित्रांसोबत चहा घेत  गप्पा मारताना मी एक प्रेमळ, विश्वासू मित्र असतो

       असा दिवस निघून गेला की वाटत एक अख्खं आयुष्य निघून गेलं. रात्री, अंगावरचे कपडे खुंटीवर टांगताना कपड्यांसोबत मी मलाच टांगत असल्याचा भास होतो. त्याच खुंटीवर काही वर्षांनी एक म्हातारी काठी टांगत असल्यासारख वाटत, तर आणखी काही वर्षांनी मी स्वत:च फोटो बनून लटकत असलेला सुद्धा दिसतो. त्या फोटोतल्या "मला" सुद्धा कितीतरी अस्तित्वे लगडलेली असतात- कुणाचा आजोबा, कुणाचा बाप, कुणाचा मित्र, तर कुणाचा शत्रू, कुणासाठी निष्फळ , निरुपयोगी, उपद्रवी, किरकिरा म्हातारा, तर कुणासाठी प्रेमळ, आनंदी, निस्वार्थी , दयाळू  देवमाणूस.

आता मी नेमका कोण आहे याचा शोध घेत घेत मन खोल जाऊ  लागत, जितक खोल जाइल तितकंच सारं फोल वाटू लागत. संभ्रमावस्थेत मग मी देवघरात जतो. तिथेही  तीच परिस्थिती - स्थितप्रद्न्य ,शांत , निश्चल अशा अनेक प्रतिमा तिथे धूळ खात पडलेल्या दिसतात , प्रार्थनेला त्यांच्यापैकी कोणाला निवडावे हा एक निराळा प्रश्न.

      तिथून उठून मी घराबाहेर पडतो , तर देवळात जावे कि मशिदीत, चर्च मध्ये कि गुरुद्वारामध्ये असे विविध प्रश्न उभे असतात माझ्या दारात. देऊळ हा ऑप्शन निवडला , तर पुन्हा कोणत्या देवळात ? हा मागोमाग येणारा प्रश्न.

 छ्या …. साला सगळच खोट  आहे , सगळच व्यर्थ आहे , मर्त्य आहे मर्यादित आहे . अमर्याद आहेत त्या फक्त माझ्या शंका आणि माझ्या पाचवीला पुजलेल्या अस्तित्वांच्या रांगा . मग अस्वस्थता, चिडचिड , स्वत: शी भांडण असे रोजचे  ठरलेले  कार्यक्रम झाले की कधीतरी मी हताश , निराश होऊन डोळे मिटून पडतो आणि अचानक शोध लागतो मला स्वत्वाचा . मला उत्तर मिळून जात ... "मी" कोणीच नाहीये , मुळात "मी" हि संकल्पना च खोटी आहे.
आहे तो फक्त प्रवास , तिमिरातून तेजाकडे, अनंतातून अनंताकडे, क्षितीजाकडून क्षितिजाकडे . मेल्यानंतरही न सुटणारी अशी चिकट अस्तित्वे आयुष्यभर कमावल्यानंतर त्यातलं एक तरी अस्तित्व कोण्या एकाच्या  तरी आयुष्यभर लक्षात राहील असे जगावे असे मला वाटते.

कारण...  खुंटी तशीच राहील तिथे , बाकी खुंटीवरचे  कपडे, काठ्या , फोटो आणि दृश्य- अदृश्य स्वरूपातील नादान , निर्लज्ज अस्तित्वे बदलतच  राहतील पिढ्यान पिढ्या ,युगानु युगे …

गर्दीत माणसांच्या हरवून जन्म गेला
नुसत्याच येरझाऱ्या, घालून जन्म गेला

--भालचंद्र जयप्रकाश भुतकर

Monday, 7 July 2014

असे जीवनाचे ऋतू फार आले
पुन्हा आसवांचे  हसे फार झाले
तसा सावराया मला  मीच होतो
जरी जीवघेणे असे वार झाले

तुझ्या वेदनांचे ठसे व्यर्थ काही
तुझ्या यातनांचे मुके अर्थ काही
जगी वावराया , पुरे एवढेसे
तुझ्या सोबतीची मला आस नाही

कसे काय सांगू ,जपतो उराशी
कसे दु:ख माझ्या भिजते उशाशी
तरी बोललेलो , कितीदा तुला मी
नको खेळ खेळू असे काळजाशी

जरी वादळे ही  सदोदीत देवा
कधी थांबलो ना तुझ्या पायरीला
नसे वाकण्याचे स्वभावात माझ्या
असे मोडलेला कणा सोबतीला

--भालचंद्र

Monday, 30 June 2014

अस्तित्व

आज सकाळी मला जाग आली तेव्हा
अंथरुणात पडलेल्या अस्तित्वांच्या गाठोड्याकडे लक्ष गेले
त्या गाठोड्यात प्रत्येक अस्तित्वासोबत
रंगी-बेरंगी बुरखे ठेवले होते कुणीतरी …बहुतेक मीच

संभ्रमावस्थेत एक बुरखा मी उचलला इतक्यात
दुसर्याने नाराजीचा सूर आळवला
दुसर्याला हातात घेताच तिसर्याने डोळे वटारले
वैतागून मग सगळे बुरखे तिथेच टाकून तडक उठलो अन ध्यानात आले
पायात बेड्या ठोकल्या होत्या कुणीतरी …बहुतेक मीच

गडबडीने खिसे चाचपुन एक किल्ली काढली
बेड्या सोडवायचे लाख प्रयत्न केले , मग आठवलं
भूतकाळाच्या कुलुपांना भविष्याची किल्ली लागत नाही
थकलो, रडलो , कुलूप तुटतंय का बघून झालं
माझ्या प्रत्येक घावानिशी अधिकाधिक मजबूत होत चाललेल्या त्या बेड्या माझ्यावर हसू लागल्या
मी हताश , निराश तसाच पडून राहिलो काही काळ

जाग आली तेव्हा माझ्याच कर्तृत्वाची दुर्गंधी पसरली होती घरभर
आता मात्र निकराने आळस झटकून उठलो
निश्चयी मुद्रेने सगळ्या बुरख्यांची घडी घालून व्यवस्थित ठेवले
उशीखाली हात फिरवला , एक किल्ली मिळाली
सगळ्या बेड्या एका झटक्यात सुटताना कळलं कि
वर्तमानाची किल्ली सगळ्या कुलुपांना लागते

सारं सामान एका पोत्यात भरून पाठीवर टाकलं
उशाशी पडलेला हसरा मुखवटा उचलला आणि दणकट पावले टाकत मी चालू लागलो

अस्तित्वाची लढाई मी रोज अशीच
कर्तव्याच्या ढाली ने नि नाईलाजाच्या तलवारीने
आजवर जिंकत आलोय

---भालचंद्र 

Wednesday, 4 June 2014

कविता

चंद्र , सूर्य , तारे,
फुले, पक्षी, झाडे
डोंगर दऱ्या नि समुद्र सारे 
सगळे जिथल्या तिथे ठेवूया 
आणि मग एक कविता लिहूया 

कशाला हव्यात सुख दुक्खांच्या कुबड्या 
अन कशाला हवीय ती ?
आठवणी वगैरे दाटून बिटून येउदेत कि यायच्यात तेव्हां 
कुंथून कुंथून किती शब्द हागणारेस ?
स्वर, व्यंजन, वृत्त, मात्रा , अलंकार
एवढेच काय तर शब्द च सारे बाजूला ठेवूया
आणि मग एक कविता लिहूया

वाहवा नि टाळयांचा मोह आवर थोडासा
स्वत्व सोडून गेलेल्या स्वत:ला सावर थोडासा
यमक छन्द जुळवशिलच की शेकडो बरी बुरी
एक तरी ओळ लिही लेका खरी खुरी
आयुष्याच्या शाईने जगणे लिहू थोड़े थोड़े
बाकी कागद सारे कोरेच ठेवूया
आणि मग एक कविता लिहूया

जखमा आणि वेदनांचे सूर आळवलेस किती
दिसू नए कोणाला म्हणून
ओघळलेले आश्रू वाळवलेस किती
देण्या घेण्याचा हिशोब होइल च की ढगात
आपण खाली फ़क्त जगणे शिकून घेउया

सूर्य चन्द्र तारे
फुले पक्षी झाडे
डोंगर दरया नि समुद्र सारे
सगळे जिथल्या तिथे ठेवुया
आणि मग एक कविता लिहूया

--भालचंद्र

Thursday, 20 February 2014

अंधारवाटा

मनाचे सगळे दरवाजे बंद असताना
एक छोटीशी फट शोधून
 आतमध्ये शिरतो ..एक तेजस्वी किरण
मी अंधारप्रिय... डोळे मिटून घेतो
तो ही हट्टी ...मिटलेल्या डोळ्यांतून ही आत शिरतो
मग मी बेचैन होतो , अस्वस्थ होतो
चिडून पुन्हा एकदा सगळे दरवाजे घट्ट लावून घेतो
तो शांत ,स्थिर ...आणखी प्रखर होतो
मग मी त्याच्याशी भांडतो
हात पाय झाड़त भोकाड पसरतो
तो तिथेच ....
थोड्या वेळाने मी शांत होतो
थकलेल्या निराश हातांनी
सगळे दरवाजे उघडतो
चहू बाजूंनी मग तो आत शिरतो
आणि माझ्या कोपरया कोपऱ्यात पसरतो
मी बिथरतो, घाबरतो, वेडापिसा होतो
शेवटी ज्याची भीती होती तेच घडत असतं
मी हताश ,केविलवान्या नजरेनी माझ्या जखमा कुरवाळतो
इतके दिवस अंधारात दडलेल्या
 माझ्या दु:खांच्या लक्तरांचे गाठोडे काखेत बांधून
त्याच्याकडे पाठ फिरवतो
आणि चालू लागतो पुन्हा
नव्या अंधाराच्या शोधात ...नव्या वाटेने ...नव्या जोमाने

                                                        --भालचंद्र

Wednesday, 5 February 2014

रोजचंच झालंय

संध्याकाळच्या वेळी नेहमीच्या त्या ठिकाणावर तू येणार म्हणून
त्याच ठिकाणी एक आडोसा बघून मी उभा असणार
तुला मी दिसणार नाही हे ठाऊक असलं तरी
तू येण्याची वेळ झाली की काळजाचा प्रत्येक ठोका चुकणार
भर थंडीत मला घाम फुटणार
आज तुला अडवून मानातलं सगळं सगळं सांगायचं,
तिच्यायला बास ....लय झालं आतल्या आत कुढायचं
तुला पाहिल्यावर रस्त्यावर अस्ताव्यस्त  पसरलेल्या माझ्या काळजाच्या तुकड्याना गोळा करून
मग मी सगळा धीर एकवटणार
तुझ्या वाटेवर डोळे लावून मनातल्या मनात वाक्यांची जुळवाजुळव करणं
हे आता रोजचंच झालंय


तू ही नेहमीचीच ...अगदी साधी, नक्षत्रासारखी
माझ्या समोरून तू येणार , आणि तशीच निघून जाणार
माझा जीव अर्धं मेला होऊन ते फक्त बघत बसणार ...
एक दिवस मात्र ठरवूनच आलो
जीव गेला तरी बेहत्तर पण आज बोलल्याशिवाय घरीच जायचं नाही
तोच आडोसा , तीच हूरहुर
काळजाच्या ठोक्यांची तीच चुकामूक 
सगळं अगदी नेहमीसारखं 
तू फक्त त्या दिवशी आली नाहीस
त्या दिवशी नाही आणि परत कधीच नाही
त्यानंतरचा प्रत्येक दिवस मी तिथे येतोय
तुझ्या भासांच्या सहवासात तिथेच घुटमळतोय

आपल्या नेहमीच्या आडोश्या पाशी 
कधी कधी पाठमोरी दिसतेस् मला तू
पण हल्ली  ठोक्यांचं चुकण बंद झालाय

परवा तो आडोसा मला म्हणत होता
"बाबा रे ...ती गेली निघून कायमची 
तू अजुन किती दिवस वाट बघणार ?
मी हसून म्हणालो ,
"असुदे रे मित्रा ... हे आता रोजचंच झालंय

दु:ख तू तिथे नसण्याचं नाही
दु:ख मी तिथे असण्याचं आहे 
तुझ्याकडे येणारे सगळे रस्ते , तो भकास रिकामा आडोसा आणि मी
आम्हीच राहिलो आहोत आता एकमेकांना 

शेवटी  मग पुन्हा ...परतीचा प्रवास ,
जड पावलांचा ....घरापर्यंत 
आणि ....जाताना एक नि:शब्द, बेफिकीर सिगर्रेट 
हे आता रोजचंच झालंय...

--भालचंद्र 

Monday, 6 January 2014

नवं - जुनं

            " नावीन्य हवे असणे " हा माणसाच्या स्वभावाचा एक अविभाज्य पैलू आहे. प्रत्येक गोष्टीत नाविण्याची ओढ ही माणसाच्या जिवंतपणाचा पुरावा असते. कोणतीही नवीन गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात घडते किंवा एखादी नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, तेंव्हा होणारा आनंद, उत्साह हा अमर्याद असतो. आपल्या भाषेत एक म्हण आहे "नव्याचे नऊ दिवस " अर्थात नवीन घटनेचे , गोष्टीचे , व्यक्तीचे कौतुक ती नवीन असेपर्यंतच असते, नंतर मात्र तिच्याकडे नजर देखील वळेनसि होते.
       विद्यार्थी दशेत असताना दरवर्षी पुढील इयत्तेत गेल्यानंतर, नवीन पुस्तके, नवीन वह्या, नवीन छत्री, नवे शिक्षक, नवे विषय आणि आयुष्यातील एक नवे पाऊल  या गोष्टी  भरपूर अभ्यास करण्याचा संकल्प करण्यासाठी पुरेशा असतात. आपण सुद्धा खूप मनापासून ठरवतो की यावर्षी पहिल्यापासूनच भरपूर अभ्यास करायचा, रोजच्या रोज गृहपाठ करायचा आणि शाळेत पहिला नंबर पटकवायचा. तो निर्धार अतिशय निर्मळ, शुद्ध आणि स्वच्छ मनाने केलेला निर्धार असतो, त्याच्यात कुठेही खोटेपणा नसतो, वाईट हेतू नसतो , अतिशय प्रामाणिकपणे घेतलेला आपला तो निर्णय असतो.  घेतलेल्या निर्णायानुसार अपा वागायला सुरूवात देखील करतो, पहिल्या दिवसापासूनच अतिशय सभ्य , हुशार ,शांत आणि सुस्वभावी होण्याचा मनापासून प्रयत्न आपण करतो  आणि तो यशस्वी देखील होतो. पण जसे जसे दिवस पुढे सरकत जातात, इयत्ता जुनी होत जाते, वह्या, पुस्तके, शिक्षक, विषय सवयीचे होत जातात, तसे तसे आपल्यातले धांदरट, खोडकर, दंगेखोर मूल बाहेर येऊ लागते , वह्यांच्या प्रारंभी च्या पानांवराती असलेले हस्ताक्षर आणि शेवटच्या पानांवराती असलेले हस्ताक्षर यांच्यात कमालीची तफावत दिसू लागते, हे हस्तलिखित एकाच माणसाचे आहे असे देखील छाती ठोक पणे कोणी सांगू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते. बघता बघता वर्ष संपून जातं, परीक्षा येतात आणि निघून जातात, मग निकालाचा दिवस उजडतो , त्या दिवशी आपला खरोखर निकाल लागतो आणि मग मन निराश होतं, हताश होतं , स्वत:वरच चिडत, आणि वर्षभर केलेल्या चुकांचा पाढा एका क्षणात आपल्याला आठवतो.
 मग असेच निराशवस्थेत काही दिवस निघून जातात , थोडं दु:ख हलकं होतं , आणि मग खचलेलं मन पुन्हा एकदा उचल खातं, कारण पुन्हा एकदा हातात आलेली असतात नवीन पुस्तकं, नवीन वह्या, नवीन विषय आणि नवीन शिक्षक , पुन्हा एकदा नव्याने आलेला असतो नवीन पावसाळा , मातीचा ओला सुगंध देखील गेल्यावर्षीपेक्षा अधिकच चांगला येतोय असं वाटू लागतं, नव्याने हिरव्यागार झालेल्या झाडांच्या पानफुलांमधे सगळी निराशा कुठल्या कुठे गायब होऊन जाते तेच काळात नाही . येणार्‍या दिवसांच्या उंबरठ्यावर नव्या ध्येयाची नवी स्वप्ने आपोआप पडू लागतात , रोजचेच सूर्यकिरण नवे भासु लागतात आणि हे येणारं वर्ष ...या वर्षी आपण नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा चांगलं करून दाखवू अशी खात्री आपली आपल्यालाच पटते. एकदा का ही खात्री पटली की मग पुढचं सगळं सोप्पं होऊन जातं.  या वर्षी देखील शाळेत आपला पहिला नंबर येत नाही , धांदरटपणा , खट्याळपणा, दंगेखोरपणा पूर्णपणे बंद होत नाही, या वर्षी ही निकालच्या दिवशी आपला निकालच लागलेला असतो , पण मागच्या वर्षीपेक्षा तो नक्कीच चांगला असतो .
      हीच तर माणसाच्या मेंदूची कमाल आहे , आपण शाळेमध्ये इतर विषय तर शिकतोच पण त्याहीपेक्षा आपण शाळेत आयुष्य जगणं शिकतो , चुकांमधून शिकणे यालाच आयुष्य म्हणतात . जुन्या चुका नव्याने करता नवीन चुका करून पुढच्या वेळी त्या चुका सुधारणे हे ज्याचे ध्येय असते तो खरं आयुष्य जगत असतो , कधी ही चुकणारा माणूस हा मृत अवस्थेप्रमाणेच असतो.
                 म्हणूनच नव्या गोष्टींचे स्वागत कोणी कसे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो , आपण सगळेच आरंभशूर असतो. नवीन गोष्ट आपण सगळेच आनंदाने , काळजीपूर्वक आणि उत्साहाने करत असतो , ती जुनी झाल्यानंतर आपण कसे वागतो यावर आपले यशापयश अवलंबुन असते. म्हणून नावीण्यावर भुराळून जाता स्वत:च्या कर्त्वव्यवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक दिवस नव्याने जगावा ,
संदीप खरे च्या कवितेतील चार ओळी मला खूप आवडतात :
             स्वत:ला विकून काय घेशिल विकत?
             खरी खरी सुखे राजा मिळती फुकट!
             हपापून बाजारात मागशील किती?
             स्वत:तच नवे काही शोधायला हवे!.... कधीतरी वेड्यागात वागायला हवे
                       कधीतरी वेड्यागात वागायला हवे
असेच स्वत: तच नवे काहीतरी शोधण्याचा या नवीन  वर्षी माझा संकल्प आहे...
          हे नवीन वर्ष तुम्हा सर्वाना आनंदाचे सुखा समाधानाचे आणि भरभराटीचे जाओ हीच प्रार्थना... नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा

                                              ---भालचंद्र 

Tuesday, 24 December 2013

प्रवास

      आभाळातल्या चंद्राला मी कधी पौर्णिमे साठी झुरताना पाहिलं नाही , अर्ध्या चंद्र कोरीत सुद्धा तो परिपूर्ण असतो . अमावास्येच्या रात्री आभाळाचा निरोप घेऊन निघून जाताना सुद्धा त्याला कधी दु : ख होत नाही आणि दुसर्या दिवशी परत येण्याची घाई पण कधी असत नाही . पहिल्या दिवशी तो जितका स्थितप्रद्न्य आणि निश्चल असतो तितकाच तो शेवटपर्यंत असतो आणि यापुढेही असेल याची मला  खात्री आहे .

      पूर्णत्वाचा गर्व नाही , अपूर्णतेचे दु: ख नाही , आणि अस्तित्वाची चिंता नाही . आहे तो फक्त प्रवास - अखंड आणि अविरत . या प्रवासाला सुरुवातही नाही अन शेवटही नाही … म्हणूनच तो सुंदर आहे , शांत आहे , परिपूर्ण आहे .
                                                                                                 -- भालचंद्र 

Thursday, 19 December 2013

थोडी गंमत (पु. ल. श्टाइल )


माणसाने प्रत्येक गोष्ट तर्कशुद्ध विचाराने करू नये , कधी कधी विचारांना सोडून नुसतं वाहत जावं, असं करण्यात मजा येते . एक वेगळाच माणूस आपल्यात लपलाय हे कळून येतं . वेडा होऊन पण वेड्यासारखं वागण्याचा कंटाळा येतो म्हणून वेडी लोकं पण कधी कधी शहण्यासारखं वागतात . मग शहाण्या माणसाना वेडे पणा करावासा वाटला नाही तरच नवल.
आमचे एक मित्र आहेत. प्रशासकीय सेवेत ऊच पदावर अधिकारी आहेत. लाल दिव्याची गाडी, सरकारी सुरक्षा , आजूबाजूला नोकर चाकर असा एकंदरीतच रूबाब मोठा दांडगा. पण रोजच्या रोज साहेब म्हणवून घ्यायचा कंटाळा येतो म्हणून सुट्टीच्या दिवशी आपल्या ड्राइवर ला आपला पोशाख देऊन त्याला साहेब करतात आणि स्वत: ड्राइवर बनतात . मोठी गंमत येते म्हणतात . आधी ड्राइवर ला पण थोडं वेगळं वाटलं , पण आता तो ही चांगला तयार झालाय . त्याला ही रोजच्या ड्राइवर पणाचा कंटाळा आला असेल , दुसरं काय ?

एकाच गोष्टीची फक्त भीती वाटते ; साहेबाच्या बायकोने रोजच्या साहेबाला कंटाळून ड्राइवर ला च एक दिवस गंमत म्हणून नवरा मानलं , तर केवढ्याला पडेल ?

---भालचंद्र

Saturday, 23 November 2013

एका फकिराचे मनोगत

परवा माझा शिर्डीला जाण्याचा योग आला. शिर्डी म्हणजे अर्थातच श्री साईबाबांचे गाव , माझ्या बहीनीची साईबाबांवर प्रचंड श्रद्धा . त्यामुळे तिच्यासोबत माझा पण शिर्डीला जाण्याचा योग आला.
पुण्यापासून शिर्डी म्हणजे साधारण २०० कि. मी. च्या आसपास. ओवरनाइट जर्नी करून आम्ही अगदी पहाटे पहाटे शिर्डी ला पोचलो. आदल्या दिवशी दिवसभर ऑफीस मध्ये दमलेलं होतो, त्यात रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. अर्धवट झोपेचा चांगलाच प्रभाव माझ्या चेहऱ्यावर दिसून येत होता. माझे सुजलेले डोळे, विस्कटलेले केस आणि पारोसं ध्यान यावरून माझी "अवस्था" कोणाच्या ही सहज लक्षात येईल अशी  होती. शिर्डी मधल्या गर्दीने  पहाटेच्या सुंदर , प्रसन्न वातावरणाला थ्रेड लावला होता. एक विचित्र , नकोनकोसं वाटणारं उबट   वातावरण मनाला अस्वस्थ करत होतं . त्या गर्दीतून वाट काढून बरोबर आम्हालाच शोधून काढून त्रास देणारे  " साब रूम चैइये क्या साब ? " असं घाणेरड्या टोन मध्ये विचारणारे लॉज वाल्यांचे चे दलाल आणि गुलाबाची फुले विकणारी , तोंडातून लाल पिंक रस्त्यावर बेधडक मारणारी  माणसं माझी चिडचिड वाढवायला पुरेशी होती.  या सगळ्यांना एकेरी झुंज देत मी आणि माझी बहीण साधारण ६ च्या आसपास दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. रांग मोठी होती , दीड दोन तासांचा सहज चुराडा होणार होता, आणि माझ्या संयमाची परीक्षा घेतली जाणार होती. मी थकलेल्या , वैतागलेल्या , त्रासीक मुद्रेने रांगेत उभा राहिलो , आम्ही पाच पाच मिनिटांना जांभया देत , शरीराला रेलिंग चा आधार देत हळू हळू रांगेतून पुढे जात होतो. गर्दी प्रचंड होती, मी ती गर्दी न्यहाळत  , स्वत:च्या संयमाचा तोल सांभाळत असताना बर्‍याच जणांच्या हातात गुलाबाची फुले असलेलं लक्षात आलं. जसं गणपतीला दुर्वा आवडतात, शंकराला बेलाची पाने आवडतात, तसं साईबाबांना गुलाब आवडत असावेत असा एक अंदाज मी एक जांभई देता देता बांधला.

     पहाटेची वेळ असल्यामुळे रात्रीच्या प्रवासातून आलेली बरीच मंडळी त्या गर्दीत होती, त्यापैकी काही जण रात्रीचं जेवण अजीर्ण झाल्याचा पुरावा बेधडक पणे देत होते. रांग पुढे जाईल तशी मागची माणसं रांग तोडून पुढे जाउ पाहायची मग बाकीचे लोक त्यांना शिव्या देऊन परत मागे यायला भाग पाडायचे. मधूनच कोणीतरी   " सद्गुरू श्री साइनाथ महाराज की ..." असं जोरात ओरडायचं मग बाकीचे सगळे " जय ..." असं त्याच टेंपो मध्ये ओरडायचे . काही जण " ओम साई नमो नम: , श्री साई नमो नम: , सद्गुरू साई नमो नम: , जय जय साई नमो नम: " असं एका विशिष्ठ चालीत म्हणायची . ही सगळी गंमत पाहत मी त्या रांगेतून आपोआप पुढे सरकत होतो .

चालता चालता म्हाताऱ्या माणसांना, बायकांना ते थकल्यानंतर बसण्यासाठी म्हणून बेन्चेस ठेवले होते , अशाच एका बेंच वर मी थोडा वेळ बसलो आणि क्षणभर डोळे मिटले.  अचानक माझ्या मेंदूमध्ये एक विलक्षण वीज चमकलि , डोकं गरगरायला लागलं, दरदरुन घाम फुटला , छाती चे ठोके वाढले , हार्ट अटॅक येतोय की काय असं वाटून मी डोळे उघडले आणि बघतो तर काय ...माझ्या समोर रेलिंग च्या नळीवर साक्षात साईबाबा बसले होते . मी चक्रावलो , वेडावलो , अस्वस्थ झालो आणि मोठ्याने ओरडणार इतक्यात ते मला म्हणाले " बाळा ...घाबरू नकोस , ओरडु पण नकोस, मी साई च आहे आणि सध्या फक्त तुलाच दिसतो आहे, इतर कोणालाही मी दिसत नाहीये , थोडं पाणी पी आणि शांत हो , तू शांत झालास की मग आपण बोलू. " मी माझ्याजवळची पाण्याची बाटली काढली आणि घटा घटा पाणी घशात ओतलं , रुमालाने घाम पुसला मग थोडा नॉर्मल ला आलो. साईबाबा माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत होते . मी पण उत्तरादाखल थोडासा हसलो, म्हणालो " बाबा, तुम्ही इकडे कसे काय ?"

साईबाबांनी त्यांची पेटंट मळकी, पांढरी कफनि घातली होती, डोक्याला टिपिकल पांढरा बंडाना बांधला होता. क्षणभर माझ्या मनात विचार येऊन गेला... साईबाबांनी निदान आता तरी असं राहायला नको , त्या वेळची त्यांची परिस्थिती हलाखीची होती , ते गरीब होतें पण आता त्यांची प्रत्येक छोट्या मोठ्या गावात मंदिरे आहेत, स्वत:ची भरपूर इस्टेट आहे, अंबानी बंधूंना लाजवेल एवढी संपत्ती आहे, आता तर त्यांनी मस्त, सूट बूट घालून दाढी वगैरे चकाचक करून कसं मस्त निवांत राहायला हवं. असा मध्यमवर्गीय विचार माझ्या मनात सुरू असतानाच बाबांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं...

"अरे मी इकडेच असतो राजा , तू इकडे कुठे ते सांग ."

"अं ..हां हां हां " मी विचारांच्या तन्द्रितुन बाहेर येऊन उगाचच हसलो आणि म्हणालो ..." अहो म्हणजे तसं नाही , एवढी सगळी लोकं तुमच्या दर्शनासाठी रांगेत उभी आहेत, खूप लांबून ते तुमच्या भेटीसाठी आलेली असताना तुम्ही ऑफीस (गाभारा) सोडून इकडे कुठे फिरताहात "?

साईबाबा मनापासून हसले आणि मला टाळी  देत म्हणाले "चांगलीच फिरकी घेतोयस हां माझी ".

"अहो मी काय तुमची फिरकी घेणार ? मलाच इथे रांगेत उभं राहून चक्कर यायची वेळ आलीय , रात्री झोप पण नाही झाली व्यवस्थित , तुमचं काय बाबा सोन्याच्या सिंहासनावर बसून तुम्ही आपल्या भक्तांची गंमत फक्त पाहत असता", मी थोडासा त्रासीक स्वरात बोललो.

बाबा-" अरे मी त्या गाभाऱ्यात नसतो हल्ली , तिथे खूप गुदमरतं मला , सुरुवाती सुरुवातीला असायचो मी तिथे , भक्तांच्या डोळ्यात श्रद्धा , सबुरी पाहून खुश व्हायचो , माझ्या जन्माचं  सार्थक झाल्यासारखं वाटायचं मला , पण हल्ली खूपच बाजारीकरण झालंय रे सगळं , पाच मिनिटं पण त्या गाभाऱ्यात मन लागत नाही, पहाटे पासून रांग उभी असते दारात , पण एकाच्या ही मनात श्रद्धा, सबुरी पाहायला मिळत नाही, ", बाबा हळहळून सांगत होते.


"अरे या लोकांनी माझ्या समाधी स्थळावर माझा पुतळा बसवला , त्याला सोन्या चांदीने मढवलं , आयुष्यभर भिक्षा मागून, फाटके, मळके कपडे घालून, भौतिक सुखापासून जाणून बुजून दूर राहिलेल्या माणसावर या लोकांनी मेल्यावर मात्र हर एक भौतिक सुखाची उधळण केली, वा रे वा ...काय ही श्रद्धा ..माझ्या वागण्यातून, बोलण्यातून मी नेहमी समता, बंधुता , प्रेम या गोष्टींचा अवलंब केला, गरीबीने , परिस्थितीने गांजलेल्या लोकांची या हातांनी जन्मभर सेवा केली, काय संदेश दिला मी तुम्हाला माझ्या जगण्यातून ? " बाबा खूप पोट तिडिकीने बोलत होते.
" आजच्या या रांगेत एकूण २३ मोठे व्यापारी आले आहेत, मी त्यांना चांगलाच ओळखून आहे कारण त्यांनी मला त्यांचा बिज़्नेस पार्ट्नर बनवला आहे. "

" बिज़्नेस पार्ट्नर ? हा काय प्रकार आहे ? ", मी एकदम चक्रावून जात विचारले.

अरे बाबा मोठे मोठे बिज़्नेसमन माझ्या पुढे येऊन लेखी करार करतात आणि त्यांच्या बिज़्नेस मध्ये भागीदारी देऊ करतात, त्यांचा  असा समज आहे की साई ला पार्ट्नर केला म्हणजे साई कृपेमुळे धंदा बुडणार नाही आणि नुकसान झालेच तर साहजिकच त्याचा फटका मला ही बसेल आणि मी माझा फायदा वाढवण्यासाठी त्यांचा धंदा वाढीस लावेन" .

" बाबा, तुम्ही हे असं पण करता "?  मी

" अरे नाही रे ...मला काय कळतय त्यांच्या बिज़्नेस मधलं ? मी एक साधा फकिर, भिक्षुक, अडाणी...  मी कशाला त्यांच्या धंद्यात ढवळाढवळ करू"?

 "मग तुम्ही त्यांना शिक्षा का करत नाही" ? मी बोललो .

"हा हा हा ...अरे मी त्यांना शासन करणारा कोण ? मी स्वता: या पृथ्वीतलावर माणूस म्हणून जन्माला आलो, भगवंता च्या  कृपेने मोक्ष प्राप्तीचा  मार्ग मला समजला , म्हणून त्या मार्गाने आयुष्यभर चाललो , चालता चालता वाटेत भेटणाऱ्याना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यागाचं महत्व पटवून दिलं, सबका मालिक एक असा संदेश मी माझ्या सहकाऱ्यांना दिला, आणि शेवटी आनंदाने माझा देह सोडून मी निघून गेलो, तर यांनी  मलाच देव बनवलं , माझ्यासमोर रोज लोटांगणं घालायला लागले, यांच्या आयुष्यात घडणाऱ्या तथाकथित सुख -दुक्खांच्या  प्रसंगांसाठी मला कारणीभूत धरू लागले.

मोठे गंमतीशीर वागतात हे लोक. म्हणजे एखाद्या विवाहित दांपत्याला लग्नाच्या ५ वर्षांनतर मूल झालं याला कारण त्यांनी शिर्डीला येऊन ५००१ रु. अर्पण केले हे . पुढे तो मुलगा मोठा झाला आणि परीक्षेत नापास झाला तर याला कारण काय तर बरेच दिवस शिर्डीला नाही गेला ...एकदा जाऊन ये म्हणजे होशील पास .
 आता हे तुम्हा लोकांच्या तरी सद्सद्विवेक बुद्धी ला पटताय का ?
पहिली गोष्ट - रुपये ५००१ हा माझा मूल जन्माला घालायचा रेट कोणी ठरवला ? आणि समजा उद्या उठून हा ५००१ रुपयांचा मुलगा दीड दमडीचा चोर बनला तर यात दोष कोणाचा ?
दुसरी गोष्ट - तुमचा मुलगा वर्षभर अभ्यास करून सुद्धा एम. बी. ए. ची परीक्षा पास होत नाही तर हा अडाणी साई तिथे काय करू शकणार आहे ?

मी साईबाबांचा सेन्स ऑफ ह्यूमर बघून मनापासून हसलो. आता आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. एकमेकांना टाळ्या देत आम्ही त्या रांगेतून पुढे जात होतो. सगळंच एकदम अनाकलनीय आणि अविश्वसनीय सुरू होतं. बघा ना साक्षात साईबाबा माझ्यासोबत त्यांच्याच मंदिरातल्या दर्शनाच्या  रांगेत उभे राहून गप्पा मारत होते आणि सबंध रांगेत या कानाची त्या कानाला खबर होत नव्हती , साईबाबा आणि माझ्या वयामध्ये किमान दीड शतकाचं अंतर होतं पण मला अगदी ते माझ्या कॉलेज मधल्या मित्राप्रमाणे वाटत  होते. मी पण सगळा थकवा , त्रास विसरून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो.

मी - बाबा , हा सगळा ढोंगीपणा तुम्ही रोज पाहता , तुमचं काळीज अगदी क्षणक्षणाला तुटत असेल ना ?

साईबाबा - आधी खूप त्रास व्हायचा सगळ्या गोष्टींचा पण आता सवईच झालंय सगळंच  , मी आता गंमतीत घेतो सगळं.

मी- पण असं सगळ्याच गोष्टी गंमतीत घेऊन कसं चालेल ?

साईबाबा - अरे आयुष्यात कोणी कसं जगायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. प्रत्येक जण आपापल्या परीनं आयुष्याला समजावून घेत जीवन जगत असतो. आणि त्या मार्गाने त्याला हवे ते मिळवायचा प्रयत्न करत असतो . कोणीही कसेही वागले म्हणून सृष्टीचे नियम बदलत नाहीत , आजही झाडावरून परिपक्व झालेलं फळ आनंदाने आपोआप जमिनीवरच पडतं , आभाळातून रिमझिमणार्‍या सरींनी आंगण भरलं की आजही प्रत्येकाच्या मनात आशेची कळी उमलतेच, सूर्य नारायण रोज आजही नित्यनेमाने उगवतोच.
या जगात कोण काय करतं यावरून कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही , लहान- मोठा , गरीब - श्रीमंत , सुख-दु:ख हा भेदभावच मुळात अतिशय अनैसर्गिक आणि दिशाभूल करणारा आहे. सृष्टी निर्माण झाल्यापासून तिचं अस्तित्व हे सगळ्यांसाठीच एक गूढ बनून राहिलं आहे. पण या सृष्टीचे काही अलिखित नियम आहेत ज्यांचे पालन केल्यामुळे माणसाचा आयुष्याचा प्रवास सुखकर होतो, अशा नियमांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासारख्याच काही व्यक्तीनी या पृथ्वीवर केला.
कुंडीमध्ये लावलेलं रोपटं थोडासा सूर्यप्रकाश आणि पुरेसं पाणी मिळालं की कसं तरारून फुलतं , आनंदाने डोलू लागतं , त्याच्या आयुष्याचा हेतूच  मुळात आनंद घेणे हा असतो , पण त्याच्या नकळत ते इतरांना आनंद देत असतं , जगणं शिकवत असतं . त्याच्याकडे पाहून जो शिकला तो शिकला , कोणी नाही शिकलं म्हणून ते रोपटं आनंद घेणं सोडत नाही . म्हणूनच माणसाने आपलं कर्म करून शांत राहायचं असतं , हेच कारण आहे की मला या सगळ्याचा राग येत नाही , कधी कधी वाईट वाटतं एवढंच .
मी तंद्री लागल्यासारखा बाबांचा प्रत्येक शब्द कानात साठवून घेत होतो.
"मी कोणी देव  नाही किंवा संतपुरूष ही नाही, ही विशेषणे मला तत्कालीन समाजाने लावली. "

मी भारावून गेलो होतो , मी बाबांना म्हणालो " बाबा, माझ्यासाठी काही आज्ञा असेल तर सांगा, समाजासाठी काही तरी करायची माझी ही ईछा आहे.

बाबा हसून म्हणाले " बाळा , एवढाच कर , मी जे तुला सांगितलं ते तुझ्या जवळच्या नातेवाईकांना , मित्रांना सांग. या फकिराचे मनोगत सगळ्यांना कळूदे . मी श्रीमंतांचा , गुन्हेगारांचा साई नसून मी गरीबाच्या अश्रू मधून ओघळणारा थेंब आहे, पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात मी आहे
लहान मुलाच्या उत्साहात मी आहे , जिथे जिथे निखळ ,नि:स्वार्थी, शुद्ध प्रेम आहे तिथे तिथे मी आहे , तुझ्यात मी आहे, माझ्यात मी आहे , आपण सारे एक आहोत , मला भेटण्यासाठी कोणालाही शिर्डीला यायची गरज नाही , या जगाकडे जो प्रेमाच्या नजरेने बघेल त्याला स्वत:च्या नजरेत मी दिसेन. माझा हा संदेश तू सगळ्यांना दे.
मी भरून आलेल्या अंत:करणाने त्या युग पुरुषाकडे बघत होतो.

अचानक माझ्या मागून एक आरोळी ऐकू आली, " बोला सद्गुरू श्री साइनाथ महाराज की ....जय !!!" आणि मी भानावर आलो . इतका वेळ चाललेलं सगळं स्वप्न होतं . मी खडबडून पाहिलं तर गाभारा जवळ आला होता , लोकांचा उत्साह द्विगुणित झाला होता, मी साईबाबांच्या गाभाऱ्याच्या एग्ज़ॅक्ट बाहेर उभा होतो  .

पाणावलेले  डोळे, भरून आलेले अंत:करण आणि समोर साईबाबा , असा तो सोहळा होता. माझ्या मागे उभ्या असलेल्या  एक बाई मला धक्का मारुन आत ढकळत होत्या ,
 मी म्हटलं " एक मिनिटं काकू मला रांगेतून बाहेर जायचंय ". असं म्हणून मी रेलिंग च्या खालून वाकून रांगेतून बाहेर आलो.

"अरे पण दर्शन "? मागच्या काकू आश्चर्याने म्हणाल्या

"माझं दर्शन मघाशीच झालाय काकू , आता खूप कामं आहेत मला … असं वेळ वाया घालवून चालणार नाही , गाभाऱ्यातलं  सोन्याचं सिंहासन खूप छान आहे म्हणतात , तुम्ही बघून या आणि सांगा मला कसं आहे ते, बाकी रांग लावून बघण्यासारखं काही उरलं नाहीये तिथे  आता.

शिर्डीला जाताना मी रिकामा गेलो होतो पण पुण्यात परत येताना माझ्याकडं भरपूर काही होतं सांगण्यासारखं , लिहिण्यासारखं  आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगण्यासारखं ...जणू काही जगातला मी सर्वात श्रीमंत माणूस झालो होतो .एवढं सगळं मला दिलं होतं ...एका फकिराने,

--भालचंद्र

Thursday, 26 September 2013

नकार

दूरवर पसरलेल्या हिरवळीमध्ये
रिमझिम बरसनार्‍या पावसाचा आनंद कसा घ्यायचा याची कधी ट्युशन लावावी लागते का ?

चंद्राचे शीतल चांदणे पांघरून शांतपणे झोपताना
"आयुष्य सुंदर आहे " हे वेगळं सांगायची गरज असते का ?

एन तरुणाईत गुलाबी थंडीतल्या गुलाबी गप्पा
तासन्तास मारण्यासाठी विषयांची कमतरता कधी भासते का ?

आपलं नातं ही अगदी तसंच आहे
तुझ्या खिडकीतून हसणारा नि माझ्या अंगणातून डोकावणारा
तो चंद्र एकच आहे
आपण एकमेकाना भेटलो नाही म्हणून काय झालं ?
आपल्याला भिजवणारा पाऊस एक आहे
आणि तो मृदगंध ही
मला सुखावणारी प्रत्येक झुळूक सुद्धा आधी तुलाच भेटून येते
याची ही मला खात्री आहे

सूर्याला पृथ्वी वरचं आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी
पृथ्वीवर यायची कधी गरज असते का ?

प्रिये , या सर्व प्रश्नांचे उत्तर "नाही" असेच आहे
म्हणूनच तर तुझ्या "नाही" चे मला कधीच वाईट वाटले नाही .

                                                                      --भालचंद्र

Wednesday, 28 August 2013

दुनियादारी

पोटासाठी तुडवायची रोजची एकच वाट
रात्रीच्या दारात पहाटेची आस

स्वप्नं सुद्धा अगदी चौकटीत बसवलेली
आतून सगळी पोकळ , वरुन मात्र भरलेली

एकाच विश्वात वसलेली प्रत्येकाची दुनिया न्यारी
आपापल्या सुख-दुक्खान्चि आपापली दुनियादारी
                                           
                                            -- भालचंद्र


Tuesday, 13 August 2013

१५ ऑगस्ट आणि आम्ही

      परवा ऑफीस मध्ये चहा घेता घेता सहजच १५ ऑगस्ट चा विषय निघाला. आमचा अव्या म्हणाला      " अरे आपण या १५ ऑगस्ट ला जनजागृती केली पाहिजे , घरोघरी जाऊन स्त्रीभ्रूण हत्ये पासून  लोकांना परावृत्त केलं पाहिजे , या सुट्टीच्या निमित्ताने आपण बोललं पाहिजे, एक जबाबदार नागरिक या नात्याने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. " असा विषय निघताच सगळे एकदम गप्प झाले, कोणीच काहीच बोलेना, त्या बिचार्याला काहीच दाद मिळेना , उलट सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. साहजिकच होतं, १५ ऑगस्ट म्हणजे आपल्याला वारसहक्काने मिळालेली सुट्टी ...त्यात ती गुरुवारी आलेली,  शुक्रवारी  रजा टाकली की लगेच शनिवार- रविवार सुट्टी.  म्हणजे दिवसांची सुट्टी घेऊन आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत मस्त एन्जॉय करायचा सगळ्यांचा प्लान होता. त्यामुळेच असल्या क्रांतीकारी, समाजहितकारक वगैरे फालतू गोष्टींसाठी कोणाला वेळ नव्हता, सबब अव्या ला रेस्पॉन्स म्हणून सगळे एकदम गप्प झाले. थोड्या वेळात अव्या चहा घेऊन निघून गेला , बाकीचे सगळे ही कामाला लागले , मी मात्र काहीसा अंतर्मुख झालो.

     मला आपल्या सगळ्यांच्या (भारतीयांच्या) मधल्या एका गोष्टीची फार गंमत वाटते. असा काही वेगळ्या मार्गाने जायचा कोणी विचार मांडला की त्याला उघडपणे कोणी विरोध ही करत नाही किंवा कोणी पाठिंबा ही देत नाही. सगळेजण एकदम गप्प बसतात ...अगदी पिनड्रॉप साइलेन्स .  बघा ना .. राज्यात दुष्काळाचे सावट आलेय , आम्ही आमच्या आमच्या बादल्या भरून गप्प. रस्त्यात कोणाचा आक्सिडेंट झालाय, आम्ही थोडासा चुकचुकाट करून गप्प. देशात बलात्कारचे प्रमाण वाढले ...आम्ही आमच्या दाराच्या कड्या लावून गप्प . तिकडे सीमेपालीकडचे नपुन्सक नराधाम  आमच्या मर्द जवानांची मुंडकी पैजा लावून पळवून नेतात , आम्ही डोळे मिटून गप्प. चाइना आमच्या भारत मातेचा पदर उडवून लावून सरळ सरळ अब्रू लुटायला बघतो , आम्ही तिकडे काणा डोळा करून गप्प. भ्रष्टाचाराच्या शर्यतीत आमचे राजकारणी दिवसेंदिवस सुवर्ण पदके पटकावतात, आम्ही त्यांच्या नावाने बोटे मोडून गप्प.
  
      मध्ये एकदा अण्णा हजारे नावाच्या पवित्र दीपस्तम्भाने आमच्या मुठी वळवायला आम्हाला भाग पाडले . धमन्यांमधून खरच रक्त धावतय आणि आपण खरच जिवंत आहोत असं वाटायला लागलं , प्रत्येकजण त्या  देवमाणसाच्या हाकेला  देत घरातून बाहेर पडला. इतक्यात सरकारने आपली विषारी खेळी खेळली, आन्णांवरतीच काहीतरी "जन्तर मंतर " केले, अचानक संघर्ष थांबला. भेद नीतीने सरकारने आंणांच्या सैन्याला भगदाड पाडले, बघता बघता आन्ंणांची टीम विस्कटली. स्वत:ला डेंगू चा डास म्हणवणारे केजरिवाल (स्वत:ची अतिशय योग्य पारख या गृहस्थानाच झाली आहे) आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून आपला एक राजकीय पक्ष स्थापन केला , तर तिकडे अण्णानि  आपल्या उरल्यासुरल्या निष्ठावंत (?) माणसांना सोबत घेऊन एक नवी फळी उभारली.

        या दरम्यान घराबाहेर पडलेली आमची पाऊले रस्त्यातच अडखाळली आणि पुन्हा आपापल्या घराकडे वळली. भरीस भर म्हणून  IPL  सुरू झाले आणि आम्ही "झाम्पिंग झापांग झम्पक झम्पक" च्या तालावर  नाचत नाचत (शी.. किती दळभद्रं गाणं होतं ते ) पुन्हा एकदा गप्प झालो .

     आजही काहीसं तसंच  झालं होतं. अव्यासारखी  देशासाठी आपापल्या परीने धडपडणारी माणसं आजही आहेत आणि ती आपल्या अवती भोवती वावारताहेत हे बघून मी मनातून सुखावलो होतो . पण त्याहीपेक्षा एक मोठं दु:ख माझं काळीज पोखरून काढत होतं. भविष्यात आव्यासारख्या लोकांना  जर अशी आमच्यासारखीच गप्प बसणारी, बोटचेपी माणसं भेटत गेली तर एक दिवस आव्यासुद्धा आमच्या सारखाच होईल. कदाचित "२६ जानेवारी ला काहीतरी उपक्रम राबवू ,  देशासाठी काहीतरी करू"  असं कोणीतरी म्हणेल तेव्हा आव्या ही हाताची घडी घालून गप्प बसलेला पाहायला मिळेल. दिवसेंदिवस मौज मस्तीच्या कैफात बुडालेली , नादान, मस्तवाल, आळासावलेली बुजगावणी  तयार करण्याचा कारखाना या हिंदुस्थानात अहोरात्र सुरू आहे या उपर दुसरे दुर्दैव ते काय ?

                                                                                                                                    --भालचंद्र